Friday, May 8, 2009

हे झाड पाहिलंस?

हे झाड पाहिलंस?
हे आधी एक बीज होतं फक्त ...
नशिबाने सुपीक जमीन मिळाली
फिरत फिरत पाऊस इकडे डोकावला
उन्ह मेहेरबान झालं...
आणि हे रुजलं
झाड म्हणून नावारुपाला आलं.
हळूहळू याला वाटू लागलं की
आपण जिथे रुजतो तीच जमीन सुपीक
आपण झुललो तरच वा-याला अस्तित्व
आपलं फुलणं ही तर पावसाची गरज
आपण सुकलो तरच उन्हाला महत्त्व
आता कधीतरी ...
याच पावसाची किंवा वा-याची लहर फिरली तर
या सुपीक जमीनीतूनही
मुळासकट उखडलं जाईल हे झाड
आणि तेव्हा याला कुणी बीज म्हणूनही ओळखणार नाही...
.......
हा कवी पाहिलास?
हा आधी एक माणूस होता... फक्त !!!

Tuesday, May 5, 2009

थॅंक गॉड कुसुमाग्रज ....

कुसुमाग्रज
बरं झालं तुमच्या काळी इंटरनेट नव्हतं...
तुम्ही मोठ्या उल्हासाने "कणा" पोस्ट केली असती
अन पापणी लवायच्या आत
तुमच्या आयडी वरच शंका घेणारा प्रतिसाद आला असता
ज्याला अनुमोदन किंवा विरोध म्हणून
चर्चा इतकी रंगली असती की
मूळ कवितेवर अजून कुणी बोललंच नाहीये
हे तुम्ही सोडून कुणाच्याच लक्षात आलं नसतं..
थॅंक गॉड कुसुमाग्रज
तुमच्याकाळी इंटरनेट नव्हतं...

दैव फारच मेहरबान असतं तर
वाचली असती एखाद्या विडंबन करणार्‍याने "कणा"
आणि मारून मोकळा झाला असता
कणाहीन विडंबनाच्या निमित्त्ताने
बायकांना आणखी एक टोमणा.
तुमचा (?) समस्त वाचकवर्ग धावत सुटला असता
पुरुषवर्गाच्या पोस्ट्स गडाबडा लोळायला लागल्या असत्या
स्त्रीवर्गाच्या पोस्ट्सवर पटापट स्माईल फुटलं असतं
मात्र
मूळ कवितेवर अजून कुणी बोललंच नाहीये
हे तुम्ही सोडून कुणाच्याच लक्षात आलं नसतं..
थॅंक गॉड कुसुमाग्रज
तुमच्याकाळी इंटरनेट नव्हतं...

किंवा तुमच्या नशीबी आला असता
एखादा गज़लकार
ज्याने "कणा" या अचानक सुचलेल्या(?)
काफ़ियाशी मिळत्याजुळत्या कवाफ़ी जमवायला घेतल्या असत्या...
किंवा एखादा छायाचित्रकार
ज्याने इंटरनेटवरूनच घेतलेल्या
बाईच्या उघड्या पाठीच्या चित्राशेजारी
तुमच्या कवितेला कट पेस्ट केलं असतं
लोकांनी ते संपूर्ण चित्र म्हणजेच
एक कविता आहे असं जाहीर केलं असतं
मात्र
मूळ कवितेवर अजून कुणी बोललंच नाहीये
हे तुम्ही सोडून कुणाच्याच लक्षात आलं नसतं..
थॅंक गॉड कुसुमाग्रज
तुमच्याकाळी इंटरनेट नव्हतं...

किंवा
"कणा"ची लांबी रुंदी मोजली गेली असती
("खोली" नव्हे , ती २ डी मॉनिटरवर कळत नाही)
किंवा तुमची कविता वाचून कुणालातरी
स्वतःची (काही वर्षांपूर्वी) लिहीलेली कविता आठवली असती
किंवा कुणाला तत्क्षणी सुचली असती
ज्यांना कदाचित
प्रचंड लोकाश्रय मिळाला असता
ज्यांचं कदाचित नवी म्हणून वा
जुनीच पुन्हा पोस्ट केली म्हणून
तोंडभरून कौतुक केलं गेलं असतं
आणि
मूळ कवितेवर अजून कुणी बोललंच नाहीये
हे तुम्ही सोडून कुणाच्याच लक्षात आलं नसतं..
थॅंक गॉड कुसुमाग्रज
तुमच्याकाळी इंटरनेट नव्हतं...

आणि कुसुमाग्रज,
मराठी वाचकांच नशीब जर
अगदीच -- असलं असतं तर
ह्यातलं काही एक घडलं नसतं ...
चंद्र, चांदण्या , प्राजक्त , मोगरा
काहीच दिसत नाही म्हणून
लोकांनी "कणा" कडे ढुंकून पाहिलं नसतं
आणि मराठी साहित्यातलं एक सोनेरी पान
अनुल्लेखाने काळवंडलं असतं...,कायमचं
मागे राहिल्या असत्या
"कणा"च्या लाखो स्पाईनलेस आवृत्त्या
हजारो ऑर्कुट प्रोफाईलस , शेकडो ब्लॉग्ज
ज्यांच्या मालकांनी आयुष्यभरासाठी
"कुसुमाग्रज" हे प्रोफाईल नेम घेतलं असतं ...
आणि मूळ कविता तिच्या कवीसकट हरवून गेली
हे कुणाच्याच लक्षात आलं नसतं
.. अगदी तुमच्यासुध्दा!

आता बोला कुसुमाग्रज
बरं झालं ना तुमच्याकाळी इंटरनेट नव्हतं ???

Thursday, April 23, 2009

आजकाल तुझ्या बोलण्यात पुन्हा पुन्हा
ग्लोबल वॉर्मिंगचा उल्लेख येतो तेव्हा ..
मला माझ्या उरातला वणवा
विझला असावा की काय
अशी भीती वाटते !!!!

आता एकदा
किना-यावरची अशी कोरडी जागा शोधू ...
जिथून कंबरेपर्यंत उसळणा-या लाटांपेक्षा
डोळ्यांना सुखावणारा सुर्यास्त
जास्त जवळचा वाटेल..
कदाचित.. त्यानंतरच
पुन्हा पाण्यात उतरायचं धाडस होईल
किंवा मोहही ... !!!

Monday, April 13, 2009

औदुंबर

मौनात नाहल्या सांजभारल्या वेळा
अंगाखांद्यावर अबोल पाखरशाळा
पायी पडलेली अर्थहीनशी धूळ
शब्दात मिळेना नि:शब्दाचे मूळ

आकस्मिक यावे वादळ व्हावी सुटका
पाखरे उडावी मुळी न करता गलका
खोलात मुळाशी हाती यावे अंबर
उन्मळून पडता शोभेचा औदुंबर

Wednesday, March 18, 2009

जगून काय साधले

जगून काय साधले विचारतोस जीवना
निदान तू तरी असे म्हणू नकोस जीवना

अजून वाटते नवल कसा असेल तो बहर
स्मरून ज्यास तू असा तरारतोस जीवना

मला नकोत हे तुझे जगावरील तोडगे
मला हवा तुझ्यावरी उपाय ठोस जीवना

अरे तिला विचार ना , तिनेच हात सोडले
पुन्हा पुन्हा मलाच का सतावतोस जीवना

जरा कुठे स्वतःस मी तजेलदार वाटतो
जुन्या दम्यापरी कसा बळावतोस जीवना

गरीब माणसांहुनी गरीब वाटतोस तू
नवी उमेद ही कुठून आणतोस जीवना

पुरेल का खरेच ही उरामधील धुगधुगी
अजून वेस दूर ती हजार कोस जीवना

Sunday, March 1, 2009

कुणाचीही चूक नसताना
दोन सिव्हिलाईज्ड कार ड्रायव्हर्स
बंद काचेआडून
ज्या पध्दतीने एकमेकांशी बोलतात ...
ते पाहून
आपल्या संसाराची आठवण येते !!!